सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे व कंत्राटी वाहन चालक भारत येटाळे यांना सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ३ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्हासनगर महापालिका वाहन विभागात ठेकेदारा मार्फत कंत्राटी पद्धतीने वाहन चालकांची नियुक्ती केली आहे. कंत्राटी वाहन चालक व मदातीनिस यांचा दरमहा वेळेत पगार काढण्यासाठी व इतर सुविधा देण्यासाठी वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे याने तक्रारदारकाकडे ३ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर, विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यावर बुधवारी सायंकाळी ५ वाजता महापालिका तरण तलावा समोरील रस्त्यावर वाहन व्यवस्थापक सगळे यांचा कंत्राटी वाहन चालक भारत येटाळे याला ३ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने रंगेहात अटक केली.
याप्रकारने महापालिका कंत्राटी कामगारांची लूट केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सगळे व येटाळे यांना अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.