जळगाव : तालुक्यातील उमाळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सुरु असलेली धुसफूस बुधवारी उफाळून आली. दोन्ही गटाने हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर चालून आले. यात भिमराव झिपरु पाटील (५३) व प्रकाश साहेबराव चव्हाण (४७) हे दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या २१ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमाळा येथे झालेल्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक मनोहर भास्कर पाटील यांच्या गटाला पाच तर प्रतिस्पर्धी राजू बाबुराव पाटील यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. निकाल लागल्यापासून दोन्ही गटात धुसफूस सुरु होती. बुधवारी गावठाण जागेत राजू पाटील व इतर सहकारी थांबलेले असताना खुन्नस देण्याच्या कारणावरुन प्रकाश चव्हाण व राजू पाटील यांच्यात वाद झाला. त्यावेळी दोघांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकाच्या अंगावर चाल केली. यावेळी राजू पाटील याच्या हातात तलवार होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दंगल, मारहाण व आर्म ॲक्टचा गुन्हाप्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजू बाबुराव पाटील, शंकर बाबुराव पाटील, रघुनाथ बाबुराव पाटील, संजय बाबुराव पाटील, युवराज नामदेव चव्हाण, नामदेव लक्ष्मण चव्हाण, किरण अण्णा चव्हाण, नितीन अण्णा चव्हाण, भिमराव झिपरु पाटील, समाधान भिमराव पाटील, किरण उर्फ भैय्या भिमराव पाटील, सुमीत निंबा धनगर, पंढरी पंडीत धनगर व सुरेश अर्जून धनगर (सर्व रा.उमाळा) यांच्याविरुध्द दंगल व आर्म ॲक्ट तर भिमराव झिपरु पाटील यांच्या फिर्यादीवरुद रघुनाथ साहेबराव चव्हाण, भगवान साहेबराव चव्हाण, प्रकाश साहेबराव चव्हाण, शेखर नाना पाटील, शुभम रघुनाथ चव्हाण, आरती संजय मोरे व मंगलाबाई रघुनाथ चव्हाण (सर्व रा.उमाळा) यांच्याविरुध्द दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांनी जखमींचा जबाब नोंदवून घटनेची माहिती घेतली.