प्रयागराजमधील बहुचर्चित उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी माफिया अतिक अहमद आणि अशरफ आता या जगात नाहीत. तर उमेश पाल हत्याकांड प्रकरणाशी संबंधित चार गुन्हेगारांचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. दरम्यान, पोलिसांनी आता अशरफचा मेहुणा सद्दाम याला अटक केली आहे. सद्दामने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत.
उमेश आणि अतिकच्या हत्येनंतर सद्दाम चार मुलींच्या संपर्कात असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. त्या सर्व त्याच्या गर्लफ्रेंड असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफचा मेहुणा सद्दाम ज्या चार मुलींच्या संपर्कात होता, त्यामधील एक बरेली, एक दिल्ली आणि दोन प्रयागराज येथील आहेत. पोलीस आणि एसटीएफने चारही मुलींचे नंबर सर्व्हिलांसवर ठेवले होते. मात्र, उमेशच्या हत्येनंतर आपण अनेक दिवस गर्लफ्रेंडसोबत बोललो नसल्याचे सद्दामने पोलिसांना सांगितले होते.
दरम्यान, यावर्षी 24 फेब्रुवारीला उमेश पालची हत्या झाली होती. या हत्येशी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची नावे जोडली गेली आहेत. उमेश तुरुंगात असताना त्याच्या हत्येचा कट माफिया बंधूंनी रचला आणि मुलगा असद याच्या मदतीने हत्या घडवून आणली, असे सांगण्यात आले. अशरफचा मेहुणा सद्दाम हा सुद्धा माफिया बंधूंना भेटण्यासाठी तुरुंगात जात होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. उमेशच्या हत्येचा कट रचण्यातही त्याने मदत केली होती.
उमेशच्या हत्येनंतर सद्दाम फरार झाला होता. पण, त्याने एप्रिलमध्ये पुन्हा मुलींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. तो पुन्हा पुन्हा नंबर बदलत राहिला. त्यामुळे सद्दाम पोलिसांच्या तावडीतून सुटायचा. बुधवारी रात्री एसटीएफला सद्दामचे दिल्लीतील ठिकाण सापडले. कारण, त्याने दिल्लीतील एका तरुणीशी संपर्क साधला होता. सद्दाम आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचला होता, मात्र तो तिला भेटण्यापूर्वीच एसटीएफने सद्दामला अटक केली. सद्दामला पोलिसांनी दिल्लीतील मालवीयनगर येथून अटक केली आहे. उमेशच्या हत्येनंतर सद्दाम दुबईला पळून गेला होता.