झाशी: उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना चकमकीत ठार केलं आहे. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या दोघांचा खात्मा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत.
दरम्यान, आज माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला त्याच्या मुलाचा एनकाउंटर झाल्याची माहिती देण्यात आली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. उमेश पाल हत्येप्रकरणी असद आणि गुलाम हे दोघेही फरार होते. या दोघांवर यूपी पोलिसांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्या दोघांवर गोळीबार केला, यात दोघेही जागीच ठार झाले.
मुख्यमंत्र्यांकडून एसटीएफचे कौतुक उमेश पाल हत्याकांडातील फरार असद अहमद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी बैठक बोलावली आहे. सीएम योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे.
उमेश पालची 24 फेब्रुवारी रोजी हत्या 24 फेब्रुवारी रोजी बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली होती. उमेश पाल आपल्या घरी जात असताना त्याच्यावर असद आणि गुलामसह इतरांनी गोळीबार केला होता. यावेळी बॉम्बही फेकण्यात आले. या हल्ल्यात उमेश पाल आणि त्यांचे दोन सरकारी बॉडीगार्ड मारले गेले. त्या दिवसापासून पोलीस आरोपींच्या शोधात होते.