मुंबई : बनावट विदेशी मद्याची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून, एका आरोपीला अटक केली आहे, तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. १० लाख ६६ हजार रुपये किमतीचे विदेशी बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. जोगेश्वरी येथे छापा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जेठालाल मनजी बाला (वय २५ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला ३१ आॅगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले आहे. सांताक्रुझ येथे आरोपीला मोटारसायकल व मद्यासहित अटक करण्यात आली. त्यानंतर, त्याने दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथील मजासवाडी टेकडी येथे छापा टाकून १० लाख ६६ हजार ६०२ रुपयांचे विदेशी बनावट मद्य व इतर सामग्री जप्त करण्यात आली. स्कॉटच्या १ लीटरच्या ७७ बाटल्या, २ लीटरच्या १० बाटल्या, पाऊण लीटरच्या ३७ बाटल्या, बाटलीचे बनावट झाकण व इतर सामग्री जप्त करण्यात आली.या गुन्ह्यातील मूळ सूत्रधार व बाटलीचे बनावट झाकण उपलब्ध करून देणारा आरोपी असे दोघे फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
करण्यात आलेल्या या करवाईनंतर भारतीय बनावटीचे कमी प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या बाटल्यांमध्ये भरून त्याची उच्चभ्रू वस्तीमध्ये कमी किमतीत विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. बनावट भेसळयुक्त मद्यामुळे सरकारचा महसूल बुडविला जातो. त्यामुळे ग्राहकांनी अशा प्रकारे मद्यखरेदी करू नये, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, संचालक उमा वर्मा व उपनगर अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक जे. एम. खिल्लारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक नीलेश गोसावी, श्याम कोळी यांचाही समावेश होता.
विदेशी मद्याच्या नावावर कमी प्रतीच्या मद्याची अनधिकृतपणे विक्री करण्यात येत असलेल्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही माहिती उघड होण्याची शक्यता असल्याचे खिल्लारे यांनी सांगितले.