नागपूर : ओळखीच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. शुक्रवारी पहाटे ही थरारक घडामोड उघड झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सूरज रामभूज शाहू (वय २५) याला अटक केली असून त्याचा न्यायालयातून पीसीआरही मिळवला आहे.
राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे (वय १५) असे मृत मुलाचे नाव असून तो एमआयडीसी परिसरातील आझादनगरात राहत होता. त्याचे वडील एका कंपनीत काम करतात. कुटुंबात आई तसेच एक भाऊ आणि एक बहिण तसेच काका आणि त्यांचा परिवार आहे. आरोपी शाहूच्या कुटुंबात आई आणि त्याच्यासह चार भाऊ आहेत. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून तो फॅब्रिकेटिंगची कामे करतो. तो रायसोनी कॉलेजच्या मागे राहतो. आझादरनगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ते लक्षात आल्यानंतर राज पांडेच्या काकांनी आरोपी शाहूचा पानउतारा केला. मुलीच्या मागे लागल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर मुलीचे लग्न झाले. त्यामुळे आरोपी शाहू राजच्या काकांवर चिडून होता. त्यांच्यावर सूड उगविण्याची तो संधी शोधत होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास १५ वर्षीय राज एसआरपीएफच्या ग्राउंडजवळ दिसताच शाहू त्याच्याजवळ गेला. राजला क्रिकेट सामने सुरू असून आपण खेळायला जाऊ असे म्हणून सोबत घेतले. त्याला तो थेट हुडकेश्वर मधील वंजारी कॉलेजजवळच्या एका निर्जन ठिकाणी नेले. दुचाकीवरून उतरून तो त्याला एका लेआऊटकडे घेऊन गेला. तोवर अंधार पडायला सुरुवात झाली होती. ईकडे कुठे क्रिकेटचे ग्राऊंड दिसत नसल्याने राजने आरोपीला भीती वाटत असल्याचे सांगून परत चलण्याचा हट्ट धरला. राजने त्याला समोर केले अन् मागून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. राज खाली पडताच नंतर त्याला आरोपी शाहूने निर्घृणपणे दगडाने ठेचले. त्यानंतर ब्लेडने त्याच्या हाताच्या नस कापून त्याची हत्या केली.
त्याला खाक्या दाखविताच त्याने राजच्या हत्येची कबुली दिली. नंतर त्याने पोलिसांना घटनास्थळ दाखवले. राज वंजारी कॉलेजजवळच्या निर्जन परिसरातून पहाटे २ ते ३ च्या सुमारास पोलिसांनी राजचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेतला. विच्छेदनानंतर राजचा मृतदेह त्याच्या घरी नेला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी तेथे शोकसंतप्त नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. पांडे कुटुंबीयांचा आक्रोश अनेकांच्या काळजाचे पाणी करणारा होता.
आयेंगी याद मेरी वफाये ... कभी मुझे भूल ना पाओंगे... राज पांडेचा व्हिडीओ व्हायरल
नराधम सूरज शाहूच्या निर्दयेतला बळी पडलेल्या राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे या निष्पाप मुलाची अंत्ययात्रा निघाली अन् त्याच्या गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओने अनेकांच्या पापण्या ओल्या केल्या. राजला त्याचे आप्तस्वकिय मंगलू नावानेच हाक देत होते. अवघा १५ वर्षांचा मंगलू चांगला गायक होता. तो खड्या आवाजात गात होता. काही दिवसांपूर्वी त्याने ‘आयेंगी याद... मेरी वफाये ... कभी मुझे भूल ना पाओंगे,
करोंगे फरियाद रो... रो... के तूम .... किसीको बता नही पाओंगे’ हे गीत गायले. त्याच्या गाण्याचा मित्रांनी व्हिडीओ बनविला. यावेळी त्याच्या गाण्याचे शब्द प्रत्यक्षात उतरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. राजचा मृतदेह घरी पोहचल्यानंतर दोनदा त्याची आई आणि काकू बेशुद्ध पडली. पुरूष मंडळी कसाबसे आपले हुंदके रोखत होती. त्याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याचा हा व्हिडीओ व्हायरल केला अन् अनेक जण अक्षरशा ओक्सोबोक्सी रडू लागले. दरम्यान, निरागस राजचा बळी घेणाऱ्या आरोपी सूरज शाहूला तातडीने फासावर टांगा, अशी मागणी करत राजचे नातेवाईक टाहो फोडत होते.