नाशिक : मोबाइल दाखविण्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून घेत आरोपी कुणाल उर्फ कान्हा मगन जाधव (२२,रा.मोताळा, जि.बुलढाणा) याने बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यास दोषी धरले. मंगळवारी (दि.२८) झालेल्या अंतीम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.देशमुख यांनी जाधव यास वीस वर्षांची सक्तमजुरी व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यावेळी पिडित मुलीने साक्ष फिरवून फितुरी केली.
म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका परिसरात भाडेतत्वावर आपल्या कुटुंबियांसह राहणाऱ्य अल्पवयीन मुलीवर आरोपी कुणाल याने दोन वर्षांपुर्वी शारिरिक अत्याचार करत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले होते. पिडित अल्पवयीन मुलीला अचानकपणे मार्च २०२० साली पोटदुखी व कोरड्या उलट्याचा त्रास उद्भवला होता. पालकांनी तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिची सोनोग्राफीद्वारे चाचणी केली. यावेळी ती अल्पवयीन मुलगी त्यावेळी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले होते. पिडितेचे कुटुंब मुळ बिहार राज्यातील छपरा येथील रहिवाशी आहेत. पालकांनी पडित मुलीला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता आरोपी कुणाल जाधव याने मोबाइल दाखिवण्याच्या बहाण्याने शारिरिक अत्याचार केल्याचे सांगितले होते. याबाबत कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिल्याचे पिडिता म्हणाली होती. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात कुणालविरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तत्कालीन महिला तपासी अधिकारी सहायक निरिक्षक एम.जी.जाधव यांनी ३० जून २०२० पावणेचार वाजेच्या सुमारास कुणाल यास अटक केली होती. त्यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १ जुलै ते ६ जुलै २०२०पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. न्यायालयाने अखेरीत आरोपी कुणाल यास दोषी धरत २०वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.पोलिसांचा तपास व साक्षीदारांची साक्ष महत्वाची!पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तपास करत परिस्थितीजन्य सबळ पुरावे व साक्षीदारांची साक्ष नोंदवून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. यावर अंतीम सुनावणी होऊन सरकारपक्षाकडून ॲड. दिपशिखा भीडे यांनी युक्तीवाद करत ११ साक्षीदार तपासले. सुनावणीदरम्यान पीडिता फितुर झाली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे, साक्ष पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने कुणाल यास दोषी धरले. या खटल्यात पोलिसांचा तपास व परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांची साक्ष गुन्हा शाबीत होण्यासाठी महत्वाची ठरली.