मुंबई - कथित नक्षलवादी समर्थक वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्याकडून जप्त केलेल्या सगळ्या पुराव्यांवरून नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आणि त्यांनी रचलेला कट हा स्पष्ट होतो असा आज खुलासा अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या परिषदेत सिंग यांनी मिलिंद तेलतुंबडेकडे सापडलेल्या कागदपत्रांतून जेएनयूच्या विद्यार्थ्यांना देखील जंगलात नक्षली प्रशिक्षणासाठी अंडरग्राउंड केले असल्याची खळबळजनक माहिती दिली.
देशभरात ९ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यात लॅपटॉप आणि त्याचे पासवर्ड, पत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने देशात अस्थिरता पसरवण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे, असे परमवीर सिंग यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी केलेल्या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. पंचनामेही करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. संगणकही जप्त करण्यात आले असून त्यातील माहिती डीकोड करण्यात आली आहे. याचा सगळाच तपशील आता सांगता येणार नाही, असे सिंग यांनी नमूद केले. या धाडसत्रात ताब्यात घेण्यात आलेल्या वरावरा राव यांची पोलीस कोठडी अत्यंत महत्वाची असल्याची माहिती देखील सिंग यांनी दिली.
वरावरा राव, अरुण फरेरा, गौतम नवलखा, वेर्नोन गोन्साल्वीस आणि सुधा भारद्वाज यांचे माओवाद्यांशी संबध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत पुरेशे पुरावे हाती आले आहेत. त्यापार्श्वभूमीवरच आम्ही या सर्वांवर कारवाई केली असे स्पष्ट करत सिंग यांनी वरवरा राव आणि रोना विल्सन यांच्यात झालेला पत्रव्यवहार उलगडला. या सर्वांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध आहेत आणि माओवाद्यांना ते पैसाही पुरवत होते, असा दावाही त्यांनी केला. यावेळी सुधा भारद्वाज यांनी कॉम्रेड प्रकाशला लिहिलेले एक पत्र सिंग यांनी वाचून दाखवले. याप्रकरणी ८ जानेवारीपासून पोलिसांनी चौकशी सुरू केली. सुधा भारद्वाज आणि कॉम्रेड प्रकाशनंतर ६ मार्च रोजी यात सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन ही आणखी दोन नावे जोडली गेली. त्यानंतर चौकशी करून पोलिसांनी १७ एप्रिल रोजी देशात ६ ठिकाणी छापे टाकले. दिल्लीत रोना विल्सन, नागपूरमध्ये सुरेंद्र गडलिंग, मुंबईत सुधीर ढवळे यांच्या घरावर तर अन्य ठिकाणी छापे टाकण्यात आले, असे सिंग यांनी सांगितले.