अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जन्मठेप हायकोर्टाने ठेवली कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 02:12 PM2019-12-09T14:12:10+5:302019-12-09T14:19:19+5:30
पोलिसांकडे तपासाअंती मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या केल्याचं कबुल केले होते.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने आज कायम ठेवत आव्हान याचिका फेटाळली आहे. हायकोर्टाच्या न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. २ मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा परिसरात हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. पोलिसांकडे तपासाअंती मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या केल्याचं कबुल केले होते.
डॅडीने या हत्येसाठी यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्काअंतर्गत २००८ साली डॅडीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. २०१२ मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला १४ लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, आज सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळत जन्मठेप कायम ठेवली.
मुंबई - कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळीची जन्मठेप मुंबई हायकोर्टाकडून कायम https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/crime/
— Lokmat (@MiLOKMAT) December 9, 2019