मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका युवकाच्या घरचा दरवाजा जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोठावला. हा युवक जेव्हा बाहेर आला तेव्हा तुझ्या नावानं एक कंपनी असून त्यात अडीचशे कोटींचा व्यवहार झाला आहे असं अधिकारी सांगतात. अधिकाऱ्यांचं ऐकून युवकाची झोप उडाली.
रतनपूरी परिसरातील बडसू गावात राहणाऱ्या एक बेरोजगार युवक अश्वनी कुमार याला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपला कॉल आला होता. या कॉलवर नोकरीबाबत त्याला सांगण्यात आले. नोकरीच्या आशेने अश्वनी कुमारनेही सर्व कागदपत्रे व्हॉट्सअपला पाठवली. या कागदपत्रांसोबतच त्याने १७५० रुपयेही पाठवले परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. आता अश्वनीच्या नावाने बनावट कंपनी आणि बँक अकाऊंट उघडून २५० कोटींची जीएसटी घोटाळा करण्यात आला आहे. सध्या जीएसटी विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.
तर कुणा व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम गेली नाही तर अश्वनी कुमारला नोकरीच्या आमिषाने फसवून कागदपत्रे घेतली गेली आणि त्या आधारे बनावट कंपनी उघडली आणि बोगस बँक अकाऊंटही उघडण्यात आले. त्यातून जीएसटी ई बिलिंग अडीचशे कोटींची हेराफेरी केली. जीएसमटी विभागासोबत आम्ही या प्रकरणाचा तपास करतोय अशी माहिती पोलीस अधीक्षक आदित्य बंसल यांनी दिली.
दरम्यान, याबाबत पीडित युवक अश्वनी कुमारनं सांगितले की, मला व्हॉट्सअपवर एक कॉल आला होता. त्यात मला कागदपत्रे मागितली गेली. मी घराचे वीज बिल, वडिलांचे आधार कार्ड आणि १७५० रुपये पाठवले. माझ्या नावावर कुठली कंपनी उघडली हे मला माहिती नाही. जीएसटी विभागाची टीम घरी पोहचली तेव्हा त्यांनी मला तुझ्या नावावर कंपनी असून घडलेला प्रकार सांगितला. मला याबाबत काही माहिती नसून जीएसटी विभाग जेव्हा चौकशीला बोलवेल आम्ही जाऊ. यावर पोलीस ठाण्यातही आम्ही तक्रार नोंदवली आहे असं युवकाने म्हटलं.