नांदेड- अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका तरुणाचा खंजरने भोसकून खून करण्यात आला होता. परंतु पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा तरुण इमारतीच्या गच्चीवरून पडल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करून खुनाचे बिंग फोडले. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
अनाथ असलेला राधेश्याम अग्रवाल हा तरुण स्नेहनगर येथील पेट्रोल पंपावर काम करीत होता. त्याला एका जणाने दत्तक घेतले होते. परंतु दत्तक घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर राधेश्याम हा जवळच किरायाने राहत होता. बहुतांश वेळी तो रात्री इमारतीच्या गच्चीवरच झोपत होता. त्यातच त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळले होते. त्याची माहिती आरोपी आकाश पालीमकर याला मिळाली. या अनैतिक संबंधाला आकाशचा विरोध होता. त्यामुळे तो राधेश्यामचा काटा काढण्याची वाट पाहत होता.
मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राधेश्याम गच्चीवर झोपलेला असताना झोपेतच त्याच्यावर आकाश पालीमकरने खंजरने सपासप आठ वार केले. त्यानंतर त्याला गच्चीवरून खाली ढकलून दिले. परंतु जीव वाचविण्यासाठी राधेश्याम गच्चीच्या कठड्याला लोंबकळला. यावेळी आरोपीने वरून हातावर लाथा घातल्या. त्यामुळे राधेश्यामचा खाली पडून जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींनी राधेश्यामचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राधेश्यामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेला. या ठिकाणी वैद्यकीय तपासणीत मात्र राधेश्यामचा मृत्यू खंजर खुपसल्यामुळे झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविला. खबऱ्याकडून माहिती काढून त्याच परिसरातून आरोपी आकाश पालीमकर आणि त्याला मदत करणारा आदिनाथ मोरे या दोघांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलिस तपासात अनैतिक संबंधाच्या कारणामुळेच राधेश्यामचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
३० जानेवारी रोजीच झाले होते लग्न
अनाथ असलेल्या राधेश्यामचे मागील महिन्यात ३० जानेवारीलाच लग्न झाले होते. परंतु त्यानंतरही त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब आकाशला समजल्यानंतर त्याने राधेश्यामचा काटा काढण्याचा कट रचला. विशेष म्हणजे पोलिस घटनास्थळी असताना आकाश आणि आदिनाथ हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या आजूबाजूलाच होते.