नवी दिल्ली - एका केंद्रीय मंत्र्यांची गुंडगिरी समोर आली आहे. कार्यालयात खोली बंद करुन अधिकाऱ्यांना खुर्चीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन अधिकारी जखमी झाले असून एका अधिकाऱ्याचा हात मोडला आहे. केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू (Bishweswar Tudu) यांच्यावर ओडिशाच्या दोन सरकारी अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा गंभीरआरोप केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या एका मंत्र्याने भाजपाच्या जिल्हा कार्यालयात त्यांना मारहाण केली, ज्यात ते जखमी झाले. याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी मात्र हे सर्व आरोप आता फेटाळून लावले आहेत. विश्वेश्वर तुडू हे केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री आहेत. मंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे उपसंचालक अश्विनी मलिक आणि सहायक संचालक देबाशीष महापात्रा यांना मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठकीसाठी बोलावले होते. हे दोन्ही अधिकारी सरकारी फाईल घेऊन येथे आले नाहीत. त्यामुळे केंद्रीय मंत्री संतप्त झाल्याचं म्हटलं जात आहे.
मारहाणीत महापात्रा यांचा उजवा हात मोडला
देबाशीष महापात्रा यांनी आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, सध्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे आम्ही फाईल आणू शकलो नाही. पण ते रागावले आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करून खुर्ची उचलून आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली असं म्हटलं आहे. या मारहाणीत महापात्रा यांचा उजवा हात मोडला असल्याचं रघुनाथ मुर्मू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं. तर अश्विनी मलिकही जखमी झाले आहेत.
केंद्रीय मंत्र्याने फेटाळून लावले आरोप
दोन्ही अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे, तसेच मलिक यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दुसरीकडे केंद्रीय मंत्र्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, हे खोटे आणि निराधार आरोप आहेत. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी दोन्ही अधिकारी खोटे आरोप करत असल्याचा दावा तुडू यांनी केला. मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी आपण दोन्ही अधिकाऱ्यांना आढावा बैठकीसाठी बोलावल्याचे मान्य केलं आहे. मात्र निवडणुकीच्या वेळापत्रकात व्यस्त असल्याचं कारण देत अधिकाऱ्यांना नंतर येण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.