बलात्काराच्या आरोपीने सोमवारी राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात बलात्कार पीडितेशी लगीनगाठ बांधली असल्याची आगळीवेगळी घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी आणि पीडित या दोघांमध्ये तडजोड झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शरद चौधरी यांनी सांगितले की, रामगंज मंडी पोलीस ठाण्याच्या आवारातील मंदिरात या पीडित मुलीचा भाऊ, त्या व्यक्तीचे वडील आणि पोलीस उपस्थित होते.
पीडित महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या मोतीलाल याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्या दोघांचे प्रेमप्रकरण होते आणि मोतीलालने मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यासंदर्भात पोलीस चौकशी सुरू असल्याचे चौधरी म्हणाले, कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे लग्न केले गेले.
रामगंज मंडी पोलीस ठाण्याचे स्टेशन अधिकारी हरीश भारती यांनी सांगितले की, ही बाब न्यायालयात प्रविष्ठ आहे. दरम्यान, रामगंज मंडी येथील उपविभागीय दंडाधिकारी बालकिशन तिवारी यांनी देशात सुरु असलेले कोविड -१९ संकट पाहता या जोडप्यास विवाह कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाकारली होती.