प्रशांत भदाणे
जळगाव : शहरातील गणपती नगरात आज, पहाटेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कार आणि दुचाकी जाळल्याची खळबळजनक घटना घडलीये. गेल्या महिन्याभरात वाहने जाळण्याच्या दोन ते तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस प्रशासनाने अशा माथेफिरूंचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
गणपती नगरातील रहिवासी श्रीची नरवानी यांच्या मालकीची कार अज्ञात माथेफिरुने आज पहाटे सव्वा तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान जाळली. ही बाब लक्षात येताच नरवानी यांनी अग्निशमन दलाला आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत नरवानी यांची कार मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले आहे. नरवानी यांची कार जाळल्यानंतर माथेफिरुने परिसरात एक दुचाकी देखील जाळल्याचं समोर आलं आहे. या घटनेसंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अशा घटना सातत्याने घडताहेत, पण पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महिनाभरात अशा प्रकारच्या दोन ते तीन घटना घडल्या आहेत. पूर्वी मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या महानगरांमध्ये वाहने जाळण्याचे प्रकार घडत होते. परंतु आता जळगाव शहरात देखील अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.