कल्याण - आपल्या दोन मुलांना घेऊन गावाला जाण्यासाठी निघालेली महिला कल्याणरेल्वे स्थानकात आली. मात्र, एका अज्ञात इसमाने तिच्या ७ महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन पळ काढला. आपल्या चिमुकल्याला अज्ञात इसमाने पळवल्याचे लक्षात आल्याने तिने याबाबत रेल्वे पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम बाळाला तसेच अजून एका चिमुकल्या मुलीला घेऊन जाताना दिसून आला. पोलिसांनी या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने त्याचा व चिमुकल्याचा शोध सुरू केला आहे.
कल्याण पश्चिम येथील आंबेडकर रोड परिसरात राधा भोईर या पती व मुलांसोबत राहते. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी राधाचे पतीसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात राधाने आपल्या दोन मुली आणि ७ महिन्याचा मुलगा कार्तिक याला घेवून रात्री साडे दहाच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक गाठले. ती चेन्नईची ट्रेन पकडून आपल्या गावी जाण्याच्या तयारीत होती. कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 2 वरील ब्रिजवरुन जात असताना तिच्या हाताला एक मुलगी होती आणि दुसरी मुलगी कल्पना हिच्या हातात ७ महिन्याचा कार्तिक होता. याच वेळी त्यांच्या मागावर असलेला एक अज्ञात इसम कल्पनाच्या जवळ आला आणि त्याने कल्पनाच्या हातात असलेल्या मुलाला आपल्या हातात घेतले आणि कल्पनाचा हात पकडून जिना चढू लागला. काही वेळात या अनोळखी व्यक्तीने कल्पनाला तू तुझ्या आईला पुढे घेऊन ये असे सांगितले. कल्पना मागे चालत असलेल्या आईला पाहण्यासाठी गेली असता हा अनोळखी इसम ७ महिन्याच्या कार्तिकला घेवून पसार झाला. याबाबत राधा व तिच्या पतीने कल्याण रेल्वे पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला.
दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात हा इसम कैद झाला असून पोलिसांनी य फुटेजच्याआधारे या इसमाचा शोध सुरू केला आहे. सदर आरोपीसंदर्भात काहीही माहिती मिळाल्यास कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे संपर्क करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेला सहा दिवसांचा कालावधी लोटला असून अद्याप मुलाचा शोध न लागल्याने कार्तिकचे आई वडील काळजीने त्रस्त झाले असून आई राधा हिची तब्बेत खालावली आहे.