उना (हिमाचल प्रदेश) - सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून बदनाम करण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात पोलिसांनी एका तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या उपमंडळ बंगाणाच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनीने तरुणावर फेक आयडी तयार करून त्रास दिल्याचा आरोप केले आहे. तसेच लग्न न केल्यास फेक आयडी बनवून त्रास देत राहण्याची धमकी सदर युवकाने दिल्याचा आरोप या युवतीने केला आहे. दरम्यान, सदर युवकाविरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सदर विद्यार्थिनीने सांगितले की, बंगाणामधील एका गावातील तरुणासोबत तिची फेसबूकवरून ओळख झाली होती. यादरम्यान, सदर तरुण हा अंमली पदार्थांचे सेवन करतो, त्यानंतर तिने त्याच्यासोबतची मैत्री तोडली. तसेच बोलणे टाळले. मात्र ते त्या तरुणाला सहन झाले नाही. त्यानंतर तो फेसबूक अकाऊंटचा गैरवापर करू लागला. एवढेच नाही, तर तो माझे फेक फेसबूक आयडी बनवून माझे फोटो अपलोड करू लागला.
खूप समजावल्यानंतरही सदर तरुण ऐकला नाही. जोपर्यंत तू माझ्याशी लग्न करत नाही तोपर्यंत मी फेक आयडी तयार करून तुला त्रास देत राहीन, अशी धमकी त्याने दिली. या तरुणाच्या चाळ्यांमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने उनामधील महिला पोलिसांकडे याची तक्रार केली. उनाचे एसपी अर्जित सेन यांनी सांगितले की, पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून सदर तरुणाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाई केली जात आहे.