नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याची अखेर भाजपाकडून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती एएनआयने दिली आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत माहिती किंवा यासंदर्भातील पत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा अपघात झाल्यानंतर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली.
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या सुरक्षेवरून सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. सीबीआयने ७ दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पीडितेच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचारांना देखील निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व खटले दिल्लीत चालवण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर भाजपाचे निलंबित आमदार सेंगर याने ४ जून २०१७ रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडीत तरुणीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण प्रकाशझोतात आले होते.