उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहे. तसेच बलात्कार पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे.
रायबरेली येथे ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातादरम्यान बलात्कार पीडित तरुणीसह अन्य तीनजण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्यांवर लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु असून बलात्कार पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचे काका तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी काकी, वकील आणि बलात्कार पीडित तरुणी रायबरेली येथे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने कारला मागून येऊन जोरदार धडक दिली. या धडकेत मावशी आणि काकीचा जागीच मृत्यू झाला तर बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहेत.
सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपा आमदार कुलदीप सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे. कुलदीपनं पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं.
नेमके काय आहे प्रकरण? भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.