वायनाड : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेला गुरूवारी पेटवून देण्यात आले. आगीत 90 टक्के भाजल्याने काल रात्री तिचा दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यावरून उत्तर प्रदेशमधील वातावरण संतप्त झाले असून गेल्या वर्षभरापासून पिडीता न्याय मागत भटकत होती. मात्र, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा केली आहे. या साऱ्या प्रकरणावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृत्यू झाल्यांतर आज उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले आहे. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पिडीतेच्या घरच्यांची भेट घेतली आहे. तसेच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे.
राहुल गांधी हे आज वायनाडमध्ये आहेत. यावेळी एका सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारत हा बलात्काराची जागतिक राजधानी बनला आहे. देशातील मुली आणि बहीणींना भारत का सुरक्षा पुरवू शकत नाही असे परदेशातून विचारले जात आहे. भाजपाचा आमदार उन्नाव बलात्कार प्रकरणात सहभागी आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर चकार शद्ब काढत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृतदेह रस्ते मार्गे उन्नावला नेला जात आहे. येथे तिला मातृभूमीच्या पोटात शांती दिली जाणार असल्याची भावना पिडीतेच्या बहीणीने व्यक्त केली आहे. चोहोबाजुंनी टीका केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उन्नावला त्यांचे दोन मंत्री पाठविले आहेत. भाजपा आमदार कुलदीप सेंगर याला काही महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली होती. तर त्याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या मुलीच्या पित्याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता.