इस्लामपूर : शहरात उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय युवकावर पोलिसानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उशिरा उघडकीस आली. हा प्रकार २९ ऑक्टोबरला घडला. या अत्याचाराची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत रविवारी पुन्हा अनौसर्गिक संभोग करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर युवकाने पोलिसात धाव घेतली. संशयित पोलिसाने पीडित युवकाकडून चार हजाराची खंडणीसुद्धा उकळली आहे. हणमंत कृष्णा देवकर (३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पीडित युवक अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. तो सध्या उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्र गस्तीसाठी संशयित पोलीस हणमंत देवकर आणि अन्य एक कर्मचारी नियुक्त होते. पहाटे तीनच्या सुमारास पीडित युवक त्याच्या परगावच्या मैत्रिणीस भेटून आपल्या वसतिगृहाकडे निघाला होता. त्यावेळी त्याला देवकर व अन्य कर्मचाऱ्याने अडवून चौकशी केली होती. अपरात्री फिरत जाऊ नकोस, अशी सूचना दुसऱ्या कर्मचाऱ्याने करत त्याला जाण्यास सांगितले. त्यावेळी देवकरने त्याचा मोबाईल नंबर लिहून घेतला होता.
पिंगळे म्हणाले, दोन दिवसांनी हणमंत देवकर युवकाच्या महाविद्यालयाच्या परिसरात गेला. त्याला संपर्क करून बाहेर बोलावून घेतले. तेथे मैत्रिणीच्या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्या आई-वडिलांना देणार, अशी धमकी देत पैशांची मागणी केली. युवकाने मित्रांकडून चार हजार रुपये उसने घेत गुगल पेद्वारे देवकरला दिले. त्यावरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने युवकाकडे, ‘तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे. तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग,’ असा तगादा लावला. युवकाने त्याला नकार दिल्यावर देवकरने त्याच्याकडेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. देवकर पीडित युवकाला जबरदस्तीने त्याच्या खोलीवर घेऊन गेला आणि तेथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेची देवकरने चित्रफीत बनवली होती.
पिंगळे म्हणाले की, देवकरने रविवारी दुपारी साडेबाराला या पीडित युवकास संपर्क करत त्याला महाविद्यालयाच्या बाहेर बोलावून घेतले. तेथे पुन्हा संभोगाची मागणी करत चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. या संपूर्ण घटनेने उद्ध्वस्त झालेला युवक प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्याने त्याच्या मित्रास घडलेला प्रकार सांगीतला. दोघांनी थेट पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम आणि माझ्याशी बोलून घडल्या प्रकाराची माहिती दिली. गेडाम यांच्या सूचनेवरून या घटनेची फिर्याद युवकाने दिल्यावर देवकरला अटक करण्यात आली. रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला आहे. देवकर याच्याविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह धमकावल्याच्या कारणाखाली गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
देवकरची बडतर्फी नक्कीपिंगळे म्हणाले, कामगिरीवर आणि वर्दीवर असताना हणमंत देवकरने केलेले कृत्य निंदनीय आहे. खात्यांतर्गत कठोर कारवाई करण्याबाबतचा अहवाल तातडीने पाठविणार आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे निलंबन होईलच, मात्र त्याची खात्यातून बडतर्फीसुद्धा अटळ ठरली आहे.
ठाण्यात भरती
हणमंत देवकर २०१० मध्ये ठाणे जिल्हा पोलीस दलात भरती झाला आहे. तेथून तो बदलून सांगलीत आला. मुख्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात सेवा केल्यावर चार महिन्यांपूर्वी तो बदलून इस्लामपूर पोलीस ठाण्यात आला आहे. त्याने यापूर्वीही अशी कृत्ये केली असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपासात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.