वाशिम : अनसिंग (ता.वाशिम) येथील युवकाच्या खून प्रकरणाचा २४ तासांतच उलगडा करण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना नांदेड व अकोला परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी रविवारी (दि.१५) पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अनसिंग (ता.वाशिम) येथील बेपत्ता असलेल्या शेख सलमान शेख बिस्मिल्ला (२५) या युवकाचा मृतदेह पुसद तालुक्यातील उडदी शेत शिवारात १४ ऑक्टोबरला सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वीदेखील एकाच आठवड्यात खूनाच्या दोन घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिस यंत्रणेने तातडीने तपासाची चक्रे बोरगाव व एरंडा येथील खून प्रकरणातील आरोपींना २४ तासांत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अटक केली होती.
अनसिंग येथील शेख सलमान शेख बिस्मिल्ला हा युवक शुक्रवारी (दि.१३) रात्रीपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता, शनिवारी सकाळी अनसिंगपासून जवळच असलेल्या उडदी शेतशिवारातील घाटात (ता.पूसद) त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने तपासकामी शोध पथके रवाना करून या घटनेचा उलगडादेखील २४ तासांच्या आत केला. व्यवसायाच्या व पूर्वीच्या वैमनस्यातून १३ ऑकटोबर रोजी आरोपींनी धारदार चाकूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह उडदी शिवारात फेकून दिला होता.
या प्रकरणातील आरोपी सोहेल सलाम शहा, उबेर पठाण अजीस पठाण, नियामत खा लियाकत खा. पठाण सर्व रा.अनसिंग हे बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना नांदेड व अकोला परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.