मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका व्यक्तीने मिरवणुकीत नाचणाऱ्या लोकांना जीपने चिरडले. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली होती आणि ज्याची माहिती आता समोर आली आहे. जीप चालवणाऱ्या व्यक्तीला ती कशी चालवायची हेच माहित नसल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे समोर आले. जीपवर ताबा ठेवता न आल्याने त्याची गाडी वरातीत घुसली अन् दोन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.
अपघात कसा झाला?वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील श्यामपूर भागातून निघालेली वरात संपूर्ण संगीतासह खतौरा गावात पोहोचली होती. वरातीत सहभागी लोक डीजे वाजवत गाण्यांच्या तालावर नाचत होते. नाचणाऱ्यांची संख्या 30 ते 40 असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वरातीत जीप चालवणाऱ्या चालकालाही नाचण्याचा मोह झाला आणि तो खाली उतरून वरातीत नाचू लागला. जाण्याआधी त्याने जीपची चावी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला दिली. पण ज्याच्या हाती चावी दिली होती त्याला गाडी नीट कशी चालवायची हे माहीत नव्हते.
ड्रायव्हरची सीट ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यक्तीने काही अंतरापर्यंत हळू हळू गाडी चालवली. पण अचानक त्याने एक्सलेटर जोरात दाबला आणि गाडीने वेग पकडला. वाहन नियंत्रणात न आल्याने भरधाव वेगात गाडी वरातीत घुसली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी काय सांगितले?शिवपुरी जिल्ह्यातील इंदर पोलिस स्टेशनचे प्रभारी केएन शर्मा यांनी लग्नाच्या मिरवणुकांना जीपने धडक दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की बुधवारी रात्री मिरवणुकीत 30-40 लोक नाचत होते. त्याचवेळी जीपने अनेकांना चिरडले. एसएचओने पुढे सांगितले की, वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला कसे चालवायचे हे माहित नव्हते. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर त्यांना शिवपुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी, गंभीर जखमींना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"