Attack on Bulandshahr Police:उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गुंड पोलिसांनाही घाबरत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथील गलीमपूर गावात काही गुंडांनी न्यायालयातून परतणाऱ्या उपनिरीक्षकावर कुत्रा सोडल्याची घटना घडली आहे. याचा विरोध केल्यावर आरोपींनी चक्क त्या उपनिरीक्षकाचा गणवेश फाडून शिवीगाळही केली. यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित पोलिस नईम अख्तर यांनी सांगितल्यानुसार, ते गलीमपुरा येथे गेले होते, तेव्हा यतीन, अभिकल आणि रिंकू यांनी पाळीव कुत्र्याला त्यांच्या दुचाकीवर सोडले. अचानक कुत्रा दुचाकीवर आल्याने नईम दुचाकीवरुन पडले. त्यांनी आरोपींना कुत्र्याला बांधून ठेवण्यास सांगितले असता ते संतप्त झाले आणि त्यांनी नईम यांना मारहाण सुरू केली.
यानंतर उपनिरीक्षक नईम अख्तर यांनी फोन करुन या प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका तरुणाला आपल्या ताब्यात घेतले. या घटनेतील उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, पोलिसांशी हाणामारीसारख्या घटना यापूर्वीही या गावात घडल्या आहेत.
ही घटना घडल्यापासून आरोपी व त्यांचे सर्व नातेवाईक गाव सोडून पळून गेले आहेत. बुलंदशहरचे पोलीस कप्तान एसएसपी श्लोक कुमार या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. गुंडांवर लवकरच नियंत्रण आणले जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या तीन नाव आणि एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.