लखनौ - उत्तर प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजधानी लखनौमध्ये घडली आहे. याठिकाणी शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर एका इसमानं ६ महिने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर खासगी नर्सिंग होममध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. ही घटना घरच्यांना समजताना त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनीही आरोपीसह नर्सिंग होमवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
लखनौच्या गोसाईगंज परिसरातील ही घटना आहे. येथे ८ वर्षीय विद्यार्थिनी जी चौथीच्या वर्गात शिकते. तिचे आई वडील मजुरी करतात. या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या कसाई उमर कुरैशी उर्फ गुड्डूने मुलीला चॉकलेट आणि टॉफीचं आमिष दाखवून तिचा छळ केला. आमिष दाखवून कुरेशीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर धारदार चाकूने पीडित युवतीला धमकावत कुणालाही याची खबर लागली तर जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी ६ महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होता. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने मुलीला बळजबरीने खासगी नर्सिंग होममध्ये घेऊन जात तिचा गर्भपात केला. मात्र मुलीच्या पोटात दुखत असल्याने आणि रक्त पाहिल्याने घरच्यांनी विचारले असता तिने सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीने कुरैशीचे नाव आई वडिलांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस आयुक्त शिरोडकर म्हणाले की, आरोपीविरोधात अटकेची कारवाई केली आहे त्याचसोबत नर्सिंग होमवरही कारवाई करण्यात येत आहे. नर्सिंग होम सील करण्यात आले आहे. तर गोसाईगंजमधील अल्पवयीन मुलीवर खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याठिकाणच्या संचालकांवर आणि डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेतील दोषींना सोडणार नाही. पोलीस आणि सरकार अशा गुन्ह्यांना माफ करणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी दिला आहे.