कानपूर : फसवणुकीच्या एका विचित्र घटनेत कानपूर येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीला पश्चिम बंगालमधील तीन लोकांनी फसवले. तक्रार आल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे. अविनाश कुमार शुक्ला असे पीडितेचे नाव असून त्यांची ९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या तिघांनी एका पीडित व्यक्तीला 'मॅजिक मिरर' खरेदी करण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली. या 'मॅजिक मिरर'च्या माध्यमातून लोकांना नग्न पाहिले जाण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले. पार्थ सिंगराय, मलय सरकार, सुदीप्त सिन्हा रॉय अशी या तिघांची नावे आहेत. नयापल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या तिघांकडून अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या. यामध्ये एक कार, ८२ हजार रुपये रोख आणि पाच मोबाईल फोन आहेत. या फोनमध्ये 'मॅजिक मिरर'च्या गूढ शक्तींचे प्रदर्शन करणारे व्हिडिओ आणि संशयास्पद कराराच्या कागदपत्रांचा समावेश होता. पीडित व्यक्ती परस्पर परिचयातून या योजनेचा भाग बनली होती. फसवणूक करणाऱ्यांनी स्वत:ची ओळख सिंगापूरच्या एका कंपनीचे कर्मचारी म्हणून करून दिली, जी पुरातन वस्तूंच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. आरोपींनी शुक्ला यांना 'मॅजिक मिरर' दोन कोटी रुपयांना मिळवून देण्याची ऑफर दिली होती.
हा 'मॅजिक मिरर' अमेरिकेतील नासाच्या शास्त्रज्ञांनी वापरल्याचे पीडित व्यक्ती अविनाश कुमार शुक्ला यांना सांगितले. यानंतर या तिघांनी अविनाश कुमार शुक्ला यांना भुवनेश्वरला जाण्यास राजी केले. हॉटेलवर पोहोचल्यावर आरोपींचे दावे निराधार ठरले, तेव्हा अविनाश कुमार शुक्ला यांनी पैसे परत मागायला सुरुवात केली. याबाबत नयापल्ली पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विश्वरंजन साहू म्हणाले, "अविनाश कुमार शुक्ला जेव्हा या आरोपींना हॉटेलमध्ये भेटले, तेव्हा त्यांना कटाचा समज झाला. तोपर्यंत ते तब्बल ९ लाख रुपये घेऊन पळून गेले."
दरम्यान, आणखी एका प्रकरणात एका चिनी नागरिकाने गुजरातमधील गुन्हेगारांशी हातमिळवणी करून फुटबॉल सट्टेबाजी अॅप तयार केले. याद्वारे सामूहिकरित्या १२०० लोकांची फसवणूक केली. अॅपचा वापर करून ९ दिवसांत सुमारे १४०० कोटी रुपयांची फसवणूक झाली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मास्टरमाइंड वू युआनबेई हा चीनच्या शेनझेन भागातील रहिवासी आहे. तो या प्रकरणाची संपूर्ण योजना पाटण आणि बनासकांठामधून चालवत असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची उकल करण्यासाठी गुजरात पोलिसांना विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करावे लागले.