स्वत:चा बिझनेस सुरू करा, माणसं जोडा, चेन बनवा, माल विका अन् पैसे कमवा. काही वर्षांत कोट्यधीश, अब्जाधीश व्हा, अशा स्वरुपाचं काम करणाऱ्या नेटवर्किंग कंपन्यांचं काम गेल्या काही वर्षांपासून जोरात सुरू आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून अल्पावधीत श्रीमंत होण्याची स्वप्नं अनेकजण पाहतात. नेटवर्किंग एजंट एकदा मागे लागले की ते सतत पाठपुरावा करत राहतात. त्यामुळे अनेकजण नेटवर्किंग एजंट्सची भुणभुण ऐकून वैतागतात. अशाच एका व्यक्तीनं थेट नेटवर्किंग एजंटचा खून केला.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील भीमपूर चकरपूरमध्ये बीएससीच्या एका विद्यार्थ्यानं नेटवर्किंग कंपनीच्या एजंटची हत्या केली. अमित असं या आरोपीचं नाव आहे. भीमपूर चकरपूरमध्येच वास्तव्यास असलेला १८ वर्षांचा विपिन अकरावीत शिकत होता. तो स्मार्ट व्हॅल्यू मार्केटिंगमध्ये कामही करायचा. अधिकाधिक लोकांना सोबत जोडण्यासाठी तो रोज कॉल करायचा. याच कॉल्सना कंटाळलेल्या अमितनं विपिनला मारण्याचा निर्णय घेतला. 'विपिन मला दररोज वेगवेगळ्या नंबरवरून अनेकदा कॉल करायचा. त्यामुळे मला मानसिक त्रास होऊ लागला. म्हणून मी विपिनचं अपहरण केलं आणि बेल्टनं गळा दाबून त्याची हत्या केली,' अशी कबुली अमितनं पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन आणि अमित बाईकवरून एका जंगल परिसराकडे गेले. एका निर्जन ठिकाणी अमितनं बाईक थांबवली. बाईकवर बसल्या बसल्या त्यानं बेल्टच्या मदतीनं विपिनचा गळा आवळला. त्यानंतर त्यानं विपिनचा मृतदेह एका शेतात लपवला. रात्री उशिरापर्यंत विपिन घरी न परतल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे अमितला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.