उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये भाजपा आमदार बाबुराम पासवान यांचा चुलत भाऊ फूलचंद यांची गुंडांनी बेदम मारहाण करून हत्या केली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आमदाराच्या भावाच्या घरी नातवाचं लग्न होतं, त्यावेळी गुंडांनी घरात घुसून कुटुंबाला मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांच्या नातींचं अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. याच दरम्यान आठ जण जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आमदारांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून कारवाईची मागणी केली.
पुरनपूर कोतवाली परिसरातील उदरहा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. जेथे पुरनपूर विधानसभेतील भाजपा आमदार बाबुराम पासवान यांचे चुलत भाऊ फूलचंद यांच्या नातवाचा विवाह सोहळा सुरू होता. त्यानंतर जवळच्या गावातील महेंद्र पाल नावाच्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसह त्यांच्या घरात घुसून फुलचंद यांना बेदम मारहाण करून नातीला ओढत पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
गुंडांनी घरात घुसून केली मारहाण
गुंडांनी कुटुंबाला बेदम मारहाण केली. ज्यात फूलचंद गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. फुलचंद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी आरोप केला की, गुंड त्यांच्या नातीचं अपहरण करण्यासाठी आले होते, त्यानंतर हाणामारी झाली, त्यात आठ जण जखमी झाले.
जखमींमध्ये मृत फुलचंद यांचा मुलगा राम सहाय, कालीचरण, शिवकुमार आणि त्यांची नात यांचाही समावेश आहे. या घटनेनंतर भाजपा आमदार बाबुराम पासवान यांनी आपल्या समर्थकांसह पोलीस ठाणं गाठलं आणि आरोपी महेंद्रसह सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कसंबसं शांत केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.