नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बदायू इथं उंदराची हत्या करण्याचं प्रकरण समोर आले आहे. ही घटना ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु हे खरे आहे. मनोज कुमार नावाच्या व्यक्तीवर हा आरोप लागलाय. या प्रकरणी पोलीस गुन्हाही नोंद झाला आहे. मनोज कुमारच्या विरोधात प्राणीमित्र संघटनेचे कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तक्रारदार विकेंद्र शर्मा यांनी लेखी तक्रारीत म्हटलंय की, मनोज कुमार याने उंदराच्या शेपटीला दगड बांधून त्याला नाल्यात फेकले. त्यानंतर मी नाल्यातून या उंदराला बाहेर काढलं परंतु तो वाचला नाही. त्यामुळे मनोज कुमार याच्यावर कारवाई करण्यात यावी. विकेंद्र शर्मा पीपल्स फॉर एनिमल्स नावाच्या प्राणी संघटनेशी जोडलेला आहे. जी संस्था मेनका गांधी चालवतात.
या मृत उंदराचं पोस्टमोर्टम बरेलीतील इंडियन वेटरनी रिसर्च इन्स्टिट्यूटला झाले. विकेंद्र शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मनोज कुमार याच्याविरोधात आयपीसी कलम ४२९ आणि पशू क्रूरता निर्मुलन कायदा कलम ११(१) एल अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे उंदराला मारल्यामुळे मनोज कुमार अडचणीत सापडले आहेत.
काय आहे प्रकरण?हे प्रकरण २४ नोव्हेंबरचं असून विकेंद्र शर्मा यांनी त्यांची तक्रार ट्विटरवर शेअर केली होती. २४ तारखेला एक व्यक्ती उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात बुडवण्याचा प्रयत्न करताना दिसला. जेव्हा मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्या उंदराला नाल्यात फेकले. त्यानंतर उंदराचा जीव वाचवण्यासाठी मी नाल्यात उतरलो आणि त्याला बाहेर काढले. पण तोपर्यंत उंदीर मेला होता. मनोज कुमार याला विकेंद्र शर्मा यांनी जाब विचारला असता, मी असेच मारतो, पुढेही मारत राहीन जे करायचे ते कर अशी धमकी दिली.
त्यानंतर विकेद्र शर्मा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. विकेंद्र शर्मा म्हणाले की, लोकांना ही गोष्ट चेष्टेची वाटते. परंतु हे प्रकरण क्रूर आहे. त्याने क्रूरतेने उंदराला मारले आणि यापुढेही असेच करणार असं आरोपीने धमकावले असं त्यांनी सांगितले. विकेंद्रच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज कुमारविरोधात गुन्हा नोंदवला आहे. उंदराचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावर पुढील कार्यवाही करणार आहेत. मनोज कुमारला या प्रकरणी अटक करून जामीनावर सोडण्यात आले आहे.
काय होऊ शकते शिक्षा?आयपीसी ४२९ कलम कुठल्याही जनावराची हत्या करणे गुन्हा आहे. जर प्राण्याची हत्या होते, त्याला विष पाजलं जाते. किंवा मारहाण केली जाते त्यात दोषी आढळल्यास ५ वर्ष कैद आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर पशू क्रूरता निर्मुलन कायदा कलम ११(१) एलनुसार, जर विनाकारण व्यक्ती प्राण्याचे हातपाय कापतो तर ती क्रूर हत्या आहे. असे केल्यास दोषी ठरल्यानंतर ३ महिने जेल आणि दंड या दोन्ही शिक्षा होण्याची शक्यता असते.