लखनौ - युपी विधानसभेत विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी उमेश पाल खून प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 'माफिया कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना जमीनदोस्त केले जाईल,' असे योगींनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी उमेश पालच्या हत्येतील एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला. आता, याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीचाही एन्काऊंटर करण्यात आलाय. युपी पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला. या आरोपीवर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
उमेश पाल हत्याप्रकरणी युपी पोलीस एक्शन मोडवर असून विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी या आरोपीला ठार करण्यात आलंय. या उस्मान चौधरीनेच उमेश पाल यांस पहिली गोळी मारली होती, असे सांगण्यात येते. प्रयागराजच्या कौधियारा परिसरात पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये, उस्मानला पोलिसांची गोळी लागली. त्यानंतर, त्यास उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आले. मात्र, डॉक्टरांनी आरोपी उस्मानला मृत घोषित केले. यापूर्वी पोलिसांनी अतीक अहमदचा खास माणूस असलेल्या अरबाजला ठार केले होते.
युपीत माफियांविरुद्ध कडक कारवाई
राज्यात गुंड आणि माफियांविरोधात 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी असेल. विशेष म्हणजे, यूपीमध्ये 'योगीराज' सुरू झाल्यापासून गुंड आणि माफियांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तुम्ही आकडे बघितले तर योगी सरकारमध्ये मार्च 2017 ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत, सुमारे 170 गुन्हेगार मारले गेले आहेत. तसेच, 4500 हून अधिक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. गरज पडली तर गाडीही पलटी होईल आणि गोळीही चालेल, असे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात सार्वजनिक मंचांवर सांगत असतात.