कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. चविष्ट सांबार बनवले नाही म्हणून एका तरुणाने आपल्या आई आणि बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. पार्वती नारायण हसलर आणि रम्या नारायण हसलर अशी मयत मायलेकींची नावे आहेत. मंजुनाथ नारायण हसलर असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याला कर्नाटकपोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गोळ्या घालून आई आणि बहिणीची हत्या
भांडणात आईने मुलगा मंजुनाथला प्रश्न विचारला की, मी आपल्या मुलीसाठी फोन खरेदी करावा की नाही हे सांगणारा तू कोण आहेस. आईच्या अशा बोलण्यामुळे मंजुनाथ चिडला आणि त्याने घरात ठेवलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाने त्याच्या आई आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या. मंजुनाथचे वडील घरी परतल्यावर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मंजुनाथचे वडील घरात येताच त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीला मुलाने ठार मारल्याचे कळले. पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, आरोपीविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
बहिणीला मोबाईल देण्यासही करत होता विरोध
आरोपी मंजुनाथ हा दारुडा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. तो अनेकदा घरात क्षुल्लक कारणावरून भांडणं करीत असे. बुधवारी तो घरी पोहचला आणि जेवायला बसला, तेव्हा सांभार चविष्ट झाले नाही म्हणून त्याचे बहीण आणि आईशी जोरदार भांडण झाले. शिवाय त्याच्या आईला कर्ज घेऊन त्याच्या बहिणीसाठी फोन खरेदी करायचा होता, यालाही त्याचा विरोध होता.