Shahram Poursafi, Wanted by FBI America: चित्रपटात किंवा पोलिस चौकीत अनेकदा आपण WANTED असे लिहिलेले गुन्हेगारांचे फोटो पाहतो. एखाद्या आरोपीची माहिती देण्यासाठी किंवा त्याला पकडून आणण्यासाठी त्या फोटोखाली काही किंमतही दिलेली असते. सहसा एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्या व्यक्तीला १ लाखापासून ते १० लाखापर्यंतचे बक्षीस जाहीर केले जाते, पण कल्पना करा की एखाद्या व्यक्तीचा गुन्हा किती मोठा असेल की त्याच्यावर चक्क अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने तब्बल १६७ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेने नुकतेच एका इराणी व्यक्तीवर १६७ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या व्यक्तीने रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या हत्येचा कट रचल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
आरोपी कोण? गुन्हा म्हणजे काय?
इराणमधील ज्या व्यक्तीला अमेरिका शोधत आहे, त्याचे नाव शाहराम पोरसाफी आहे. अमेरिकेने IRGC संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. शहाराम पौरसफी हा या संस्थेचा सदस्य आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, शाहराम पोरसाफी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स-कुड्स फोर्स (IRGC-QF) च्या वतीने हत्येसाठी सुपारी देण्याच्या कटात सहभारी होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांना टार्गेट करून त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने इराणी व्यक्तीवर केला आहे. त्यामुळे या व्यक्तीला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
अमेरिकेने गुरुवारी अचानक शहाराम पोरसाफी यांच्या विरोधात ही नोटीस जारी केली. कारण अध्यक्षीय निवडणुकीचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या जीवाला इराणकडून मोठा धोका आहे. इराणी व्यक्तीने ट्रम्प यांचे सल्लागार बोल्टन यांना लक्ष्य का केले असावे याबद्दल असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, बोल्टन हे परराष्ट्र धोरणाचे मास्टर असून ते इराणचे टीकाकार होते.
अडीच कोटींची सुपारी
अमेरिकेचे म्हणणे आहे की इराणी शाहराम पोरसाफी बोल्टनच्या हत्येत कथितपणे सहभागी होता आणि हत्येचा कट रचत होता. शाहराम पोरसाफीने वॉशिंग्टन, डीसी येथे ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान सुमारे अडीच कोटी रुपयांच्या बदल्यात सुरक्षा सल्लागार बोल्टन यांच्या हत्येचा कट रचला होता. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, २०१८ ते २०१९ दरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना सल्लागार बोल्टन यांच्या विरोधात इराणी व्यक्तीने हा कट रचला होता. शाहराम पोरसाफी यांच्यावर हत्येच्या कटाच्या योजनेत शस्त्रे जप्त केल्याचा आरोप आहे.