मुंबई - अमेरिकेत नोकरी करणारी तरुणीला शादी डॉट कॉमद्वारे गुगलमध्ये कामाला असलेल्या तरुणाचे स्थळही तिला चालून आले होते. तिला भेटण्यासाठी तो अमेरिकेत गेला असताना अमेरिकेतील सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनचे अधिकारी मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली त्याला अटक केल्याचे भासवून भामट्या तरुणाने त्याच्या सुटकेसाठी तरुणीकडून 27 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांवर जमा करण्यास सांगितले. त्याचवेळी चौकशीसाठी तिचे कुटुंबीय तरुणाच्या घरी पोहोचतात आणि त्याचे बिंग फुटते. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या भामट्याला बुधवारी अटक केली.
कार्तिकी पटेल (नाव बदलले आहे) या तरुणीने शादी डॉट कॉम संकेतस्थळावर लग्न जुळविण्यासाठी नाव नोंदणी केली होती. त्यावरून निमेश बाबूभाई चौटालिया (वय 32) या तरुणाने तिच्याशी संपर्क साधला. आपण गुगलमध्ये नोकरीला असून आपली10 कोटींची गुंतवणूक आहे. कामानिमित्त लंडनमध्ये आहे. तेथून थेट अमेरिकेत येत असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी मर्यादेपेक्षा अधिक रक्कम बाळगल्याने वॉशिंग्टन विमानतळावर स्थानिक यंत्रणेने ताब्यात घेतल्याची बतावणी करत निमेशने कार्तिकीला ई-मेलद्वारे कळवले होते. त्यानंतर विविध कारणे सांगून त्याने वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्याची विनवणी तिला केली. निमेशच्या भूलथापांना बळी पडून कार्तिकीने 29 वेळा एकूण 37 हजार अमेरिकन डॉलर (26 लाख 49 हजार रुपये) वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केले. यंदाच्या वर्षी 27 जुलैपासून 1 ऑक्टोबरपर्यंत हे व्यवहार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, तिचे वडील विलेपार्ले येथील निमेशच्या घरी गेले. त्याच्या कुटुंबीयांनी आपला मुलगा अमेरिकेत कधी गेलाच नसल्याचे सांगितले. अखेर मुलीच्या वडिलांनी निमेशला दूरध्वनी करून भेटायला बोलावले. मात्र, सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर निमेशने तेथून पळ काढला. याप्रकरणी कार्तिकीच्या वडिलांनी गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखा कक्ष 2च्या पोलिसांनी त्याला घाटकोपरमधून अटक केली. आरोपीने अशा प्रकारे इतर मुलींचीही फसवणूक केल्याचा संशय असून अशा कृत्यामागे आरोपीचे इतर साथीदारही आहेत का? याबाबत पोलिस तपास करत आहेत.