लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन त्याद्वारे त्यांचा पी ए बोलत असल्याचे भासवून एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून २० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा व त्यातील २ लाख रुपये स्वीकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून ६ जणांना अटक केली आहे.
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०, रा. हडपसर), सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८, रा. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय २५) चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि आकाश शरद निकाळजे (वय २४, रा. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण काकडे हा मुख्य सुत्रधार असून त्याने गुगल प्ले स्टोअरमधून फेक कॉल अॅप नावाचे अॅप डाऊनलोड करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्यावरुन त्याने दहा दिवसांपूर्वी अतुल गोयल यांना फोन केला. गोयल यांना तो अजित पवार यांच्याकडून फोन आला, असे वाटले. फोनवरुन त्याने आपण पी ए चौबे बोलतोय असे भासविले. हवेली तालुक्यातील वाढे बोल्हाई येथील शिरसवडी येथील जमिनीसंदर्भातील वाद मिटवून टाका, असे खोटे सांगून वाद मिटविला नाही तर तुम्हाला गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यामुळे गोयल यांना शंका आली. त्यांनी गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला. पोलिसांच्या सांगण्यानुसार गोयल यांनी खंडणीची रक्कम घेण्यासाठी बंडगार्डन रोडवरील सन मावू कॉम्प्लेक्समधील कार्यालयात बोलावले. पोलिसांनी तेथे सापळा रचला होता. त्यानुसार गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तिघे जण २ लाख रुपये घेण्यासाठी कार्यालयात आले होते. तिघे जण खालीच थांबले होते. पैसे घेतल्याबरोबर पोलिसांनी झडप घालून तिघांना पकडले. त्याचवेळी संपूर्ण परिसरात साध्या वेशातील पोलीस नजर ठेवून होते. कार्यालयात खंडणीखोरांना पकडल्याचे समजल्याबरोबर खाली थांबलेल्या तिघांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांच्या पथकाने केली.