नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला पंधरा दिवस लाेटले आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहेत. परंतु पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची चिन्हे आहेत. मारेकऱ्यांनी घटनेच्या दिवशी व्हाॅट्सॲप कॉलचा वापर केल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी आतापर्यंत त्या भागातील जवळपास १० हजार जणांचे मोबाइल क्रमांक तपासले आहेत. परंतु त्यातून फारसे काही हाती लागले नाही. बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मारेकरी हे दुचाकीवरून आले होते. दोघांपैकी एकाकडे छोटी बॅग होती. या बॅगमध्ये डोंगल ठेवलेले असल्याची शक्यता आहे. या डोंगलचा वापर करून मोबाइल फ्लाइट मोडमध्ये टाकल्यानंतर वायफायद्वारे आरोपी हे व्हाॅट्सॲप कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांना मोबाइलवरून आरोपी ट्रेस करणे अवघड होऊन बसते.
रहिवासी भटकतो अन् आरोपी होतो पसारबियाणी राहत असलेल्या शारदानगर परिसरात अनेक छोट्या गल्लीबोळा आहेत. नांदेडचा रहिवासी असलेला नागरिक जरी, त्या भागात गेला तर तो भटकतो. बऱ्याच वेळा नेमक्या कोणत्या गल्लीतून जावे याबाबत बुचकळ्यात पडतो. असे असताना आरोपी मात्र गोळ्या झाडल्यानंतर सराईतपणे त्या भागातून बाहेर कसे पडले? हाही संशोधनचा विषय आहे.