कल्याण - एकिकडे मध्यरात्री आणि भरदिवसा घरफोडयांचे सत्र सुरू असताना बाजारपेठ पोलिसांनी गणेश प्रभाकर शिंदे (वय 40) या घरफोडी करणा-या अट्टल चोरटयाला अटक केली आहे. तो टिटवाळा बनेली या परिसरातील राहणारा असून दोन सहका-यांच्या सहाय्याने तो घरफोडी करायचा. त्याच्याकडून चोरीचे सव्वादोन लाखांचे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.
12 जुलैला बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी गुन्हयाचा तपास सुरू होता. अखेर पाच महिन्यांनी चोरटयाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त बातमीदारामार्फत आधारे शिंदे ला रहात्या घरातून शनिवारी अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने त्याच्या दोन सहकाया-यांच्या साथीने बाजारपेठ हद्दीत चार ठिकाणी घरफोडी केल्याचे समोर आले. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याचे माने पाटील यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे शिंदे हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. पण सहका-यांच्या मदतीने तो रात्री घरफोडी करायचा असेही तपासात समोर आल्याचे माने पाटील म्हणाले.