मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहितेने आपल्या पतीविरुद्ध मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विवाहित महिलेचा नवरा जबरदस्तीने तिला नॉनव्हेज खाण्यासाठी देत होता. यादरम्यान महिलेने नॉनव्हेज खाण्यास नकार दिला असता तिला फक्त उपाशी ठेवलं नाही तर तिला बेदम मारहाणही केली असा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे इंदूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचा विवाह 5 मार्च 2016 रोजी जयपूर येथील अंकित फतेहपुरियासोबत झाला होता. लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह सुमारे एक कोटी रुपयांचा हुंडा दिला होता. असे असतानाही अंकितने पुन्हा एकदा एक कोटी रुपयांची मागणी सुरू केली आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करण्यास तिचे वडील पुन्हा असमर्थता व्यक्त करत असल्याने आरोपी लहान-लहान गोष्टींवर तिला त्रास देत आहे.
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आरोपी पतीने हुंडा म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली.पीडितेने सांगितले की, "पती मला हॉटेलमध्ये घेऊन गेला की येथे नॉनव्हेज खाण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करत होता. नॉनव्हेज खाण्यास नकार दिल्यानंतर पती मला न जेवता घरी पाठवायचा आणि घरी आल्यावर बेदम मारहाण करत होता." तसेच, पीडितेने सांगितले की, तिची एक आत्या आहे, जी जयपूरमध्ये राहते. तिने आरोपी पतीला अनेकदा आत्याच्या घरी जाण्यासाठी किंवा तिला भेटण्याचा आग्रह केला, परंतु प्रत्येक वेळी आत्याचे नाव ऐकताच आरोपी तिच्याशी भांडत होता. या रोजच्या छळाला कंटाळून ती सासरच्या घरातून पळून माहेरी आली आहे.
याचबरोबर, या पीडित महिलेची अडचण लक्षात घेऊन कुटुंबीयांनी अनेकवेळा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. जयपूर येथे आल्यानंतर आरोपी पतीला त्यांच्या घरी बोलावून खूप समजावले. यानंतर काही दिवस सासरच्या घरी सर्व काही सुरळीत होते. मात्र काही दिवसांनी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून छळ सुरू झाला. अशा परिस्थितीत सासरच्या घरी राहणे कठीण झाले होते, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.