उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये चोरांच्या एका हायटेक गँगचा पर्दाफाश झाला आहे. हे चोरचोरी करण्यासाठी चक्क विमानाने जायचे. चोरी केल्यानंतरही ते विमानानेच परत यायचे. सध्या या गँगमधील पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे चोरीचे दागिने आणि मौल्यवान भांडी जप्त करण्यात आली आहेत.
मिर्झापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या घटनेचा तपास सुरू असतानाच चुनार येथे पाच जणांना पकडण्यात आलं. चौकशीत पाचही जणांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच ते दिवसा जी घरं बंद आहेत त्याची रेकी करायचे आणि रात्री चोरी करायचे, असंही त्यांनी सांगितलं. मिर्झापूरशिवाय मुंबई, वाराणसी, भदोही, सोनभद्र येथेही ही गँग सक्रिय होती.
अटक करण्यात आलेले आरोपी नथू प्रसाद, आकाश पटेल, अमित राजभर, मनोज सेठ हे वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींपैकी एक सूरज रामाश्रय यादव हा महाराष्ट्रातील पालघरचा रहिवासी आहे. ज्यावर मिर्झापूर आणि वाराणसीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
नत्थू प्रसादवर विविध पोलीस ठाण्यात १६ तर आकाश पटेलविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १२० किलो पितळेची भांडी, मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि कुलूप तोडण्यासाठी वापरली जाणारी अवजारं आदी साहित्य जप्त केलं आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, या लोकांचा मुंबईतही चोरीच्या घटनांमध्ये हात आहे. ते विमानाने मुंबईत चोरी करण्यासाठी ये- जा करत असत. त्यामुळे आम्ही आता मुंबई पोलिसांशीही संपर्क साधत आहोत. सध्या पाचही आरोपींना जेलमध्ये पाठविण्याची कारवाई सुरू आहे.