नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान (Uttar Pradesh Assembly Elections 2022) बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाजपाला मतदान करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे संतप्त झालेल्या काही गुंडांनी महिलेला बेदम मारहाण केली. महिलेला एवढी मारहाण केली की ती बेशुद्ध होऊन पडली. त्याचवेळी माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी महिलेला जखमी अवस्थेत बांदा जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बांदा जिल्ह्यातील मटौध पोलीस स्टेशन हद्दीतील अछरौड गावातील आहे. मुन्नी देवी असं या महिलेचं नाव असून तिच्या पतीचं नाव अच्छेलाल आहे. मुन्नी देवी हिला गावातील काही गुंडांनी बेदम मारहाण करून जखमी केलं आहे. महिलेचा पती अच्छेलाल याने दिलेल्या माहितीनुसार, गावातील हिमांशू आणि त्याच्या लहान भावाने मुन्नी देवीला मारहाण केली आहे. तिने विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला मतदान केले होते.
धक्कादायक बाब म्हणजे भाजपाला मतदान केल्याने संतापलेल्या गुंडांनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यासोबतच बसपा पक्षाला मत का दिलं नाही असा सवाल देखील विचारला. अशा स्थितीत महिलेनेही या गोष्टींबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुंडांनी महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली. स्थानिकांना या घटनेची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना दिली आणि तिला लगेचच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मटौध पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद सिंह गौर यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. गौर यांनी अछरौड गावातील रहिवासी अच्छेलाल याने घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. सध्या प्राथमिक तपासात दारूच्या नशेत वाद झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. यासोबतच मारहाणीचे प्रकरणही समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.