बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - 16 वर्षांच्या युवतीचा भर बाजारामध्ये लिलाव करण्याचा संतापजनक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील अहमदगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा प्रकार घडला असून, या लिलावात सहभागी होण्यासाठी 20 वर्षाच्या तरुणांपासून 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंतची मंडळी घटनास्थळावर उपस्थित होती. लिलावात पीडित युवतीवर 50 हजार रुपयांपासून बोली सुरू झाली. तसेच ही बोली 80 हजारांपर्यंत पोहोचली. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळावर येत पीडितेची सुटका केली आणि तिच्या लिलावाचा डाव उधळून लावला. याबाबत सविस्तर माहिती अशी, झारखंडमधील रांची येथील रहिवासी असलेल्या या 16 वर्षीय मुलीच्या आईचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या सावत्र आईने या मुलीला रांचीजवळील पिसका नगरी गावातील कलावती या महिलेला 50 हजार पुयांना विकले. त्यानंतर या कलावती नामक महिलेने या मुलीला बुलंदशहरमधील गावात विक्रीसाठी आणले. त्यानंतर संपूर्ण गावात ही खबर पसरली. बघता बघता गर्दी गोळा झाली. निरागस युवतीवर बोली लागण्यास सुरुवात झाली. बोली लावणाऱ्यांमध्ये तरुणांपासून वुद्धही आघाडीवर होते. बघता बघता बोलीचा आकडा 80 हजारांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला काय चालले आहे हे पीडितेला समजलेच नाही. मात्र बोली लावणाऱ्या लोकांनी तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली तेव्हा ती युवती घाबरून रडू लागली. तेवढ्यात पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सुटका करत 2 महिलांसह 7 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीडितेला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलावतीचाही समावेश आहे. सध्या पीडित युवती महिला सेलच्या ताब्यात असून, ती आपल्या कुटुंबीयांची वाट पाहत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेली कलावती या महिलेने यापूर्वीही अनेक तरुणींची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला झारखंडमधील विविध भागातून 30 ते 50 हजार रुपयांना खरेदी करते नंतर या मुलींची एक लाख रुपयांपर्यंतच्या किमतीस विक्री करते.
संतापजनक! भर बाजारात युवतीचा लिलाव, 80 हजारांपर्यंत लागली बोली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 4:52 PM