उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचाच काटा काढला आहे. धक्कादायक बाब म्हणचे पतीची हत्या करून त्याचा मृतदेह हा बांधकाम सुरू असलेल्या एका घरात खड्डा खणून पुरला. दोघांची कसून चौकशी केली असता हत्येची कबुली दिली. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडला गावात ही घटना घडली आहे. 6 जून रोजी सागर अचानक गायब झाला होता, त्यासंदर्भात नातेवाईकांनी पोलिसांत तक्रारही केली होती. खूप प्रयत्न करूनही बेपत्ता सागरचा पत्ता लागला नाही. मृत सागरची पत्नी आशिया आणि सावत्र भाऊ सुहेल यांना संशयाच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांची चौकशी केली असता ही खळबळजनक घटना समोर आली आहे.
सुरुवातीला दोघेही दिशाभूल करत राहिले, मात्र कारवाई केल्यावर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि सागरची हत्या केल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. ज्यामध्ये सागर अडथळा बनत होता. त्यांनी सागरची हत्या केली आणि बांधकाम सुरू असलेल्या घरात खड्डा खणून मृतदेह पुरला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांच्या चौकशीत दोघांनी हत्येची कबुली दिल्यावर हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बांधकाम सुरू असलेल्या घराचा शोध घेतला. मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.