कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबीच्या जिल्हा रुग्णालयात एका नवजात बाळाचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्मर मशीनचे हीटिंग पॅड खूप गरम झाले होते. तशा गरम पॅडवर त्या बाळाला ठेवल्याने त्याची छाती आणि पोटावरची कातडी पूर्णपणे भाजून शरीरातून धूर आला. यात त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फतेहपूरच्या हरिश्चंद्रपूर गावातील रहिवासी जुनैद अहमदनं पत्नी मेहिलिकाला प्रसुती वेदान झाल्यानंतर 14 ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात भरती केलं होतं. सायंकाळी 6.15 वाजता मेहिलिकाने एका मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याने कुटुंबिय खूप आनंदात होते. डिलीव्हरी झाल्यानंतर घरी जाता येईल असे त्यांना वाटलं होतं, पण बाळाची प्रकृती थोडी ठीक नसल्याचं सांगत डॉक्टरनं बाळाला SNCU वार्डमध्ये शिफ्ट केलं.
कुटुंबियांना बाळाला भेटू दिलं नाहीबाळाला लहान मुलांच्या वर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर आईसह कुटुंबातील कुणालाही त्या बाळाजवळ जाऊ दिलं नाही. रविवारी सकाळी बाळाची आजी त्याला पाहण्यासाठी गेली असता, तिला बाळाचे शरीर निळे झालेले दिसले आणि त्याच्या शरीरातून धूर येत होता. तसेच, त्याच्या छाती आणि पोटावरची पूर्ण कातडी भाजली होती.
हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांचा गोंधळहॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची त्या बाळावर नजर पडताच त्यांना धक्का बसला. तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबिय चांगलेच संतापले आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यांनी हॉस्पिटल कर्मचाऱ्यावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. हॉस्पिटलचा स्टाफ मोबाइलमध्ये व्यस्त होता, त्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांचा आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हॉस्पिटलच्या प्रमुखांनीही दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे.