कानपूर:उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत आई-मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस-प्रशासन गेले होते. यादरम्यान, झोपडीला आग लागली आणि यात दोघींचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यावेळी दोघींनी बचावासाठी आरडाओरड सुरू केला, पण पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी बचावासाठी काहीच केले नाही. या घटनेत पत्नी आणि मुलीला वाचवण्यासाठी गेलेले पती कृष्ण गोपाल हेदेखील गंभीररित्या भाजले आहेत.
मैठा तहसीलच्या मडौली गावात आई प्रमिला दीक्षित (41) आणि मुलगी नेहा (21) यांच्या मृत्यूनंतर गावकरी संतप्त झाले. ग्रामस्थांनी पोलिस-प्रशासकीय अधिकाऱ्यां पळवून लावले. अधिकाऱ्यांनीही पळून आपला जीव वाचवला. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरुच होता. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एसडीएम ज्ञानेश्वर प्रसाद, एसएचओ दिनेश गौतम, लेखपाल अशोक सिंह यांच्यासह 40 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर कानपूरचे पोली, आयुक्त राज शेखर, डीएम नेहा जैन, एडीजी आलोक कुमार आणि इतर अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबले होते. राज्यमंत्री प्रतिभा शुक्लाही तिथे पोहोचल्या. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली, मात्र कुटुंबीयांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. दुसरीकडे, प्रमिलाचे पती कृष्ण गोपाल दीक्षित यांनी एसडीएम आणि इतर अधिकाऱ्यांवर आग लावल्याचा आरोप केला आहे.
ते म्हणाले की, मी आणि मुलगा कसेबसे झोपडीतून बाहेर पडलो, पण आई आणि मुलगी आतच राहिल्याने होरपळून मरण पावल्या. अधिकारी आम्हाला तशाच अवस्थेत सोडून पळून गेले, कोणीही कसलीही मदत केली नाही. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये खूप आरडा-ओरड ऐकू येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.