वाराणसी: योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीला चाप लागल्याचा दावा भाजपकडून केला जातो. मात्र या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या जवळपास घटना दररोज उत्तर प्रदेशात घडतात. वाराणसीत नुकतीच अशी घटना घडली. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव घेऊन चोरट्यांनी महिलेला लुटलं. अशीच दुसरी घटना घडली. बोगस पोलीस बनून आलेल्या व्यक्तीनं महिलेचे दागिने लुटून पळ काढला.
वाराणसीतल्या भेलपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या मालती उपाध्याय २८ मार्चला बँकेतून पैसे काढायला जात होत्या. बँकेजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना रोखलं. सोन्याचे दागिने परिधान केलेल्यांना त्यांना ते तातडीनं उतरवण्यास सांगा, असं तरुणांनी सांगितल्याचं दावा मालती यांनी केला. योगींचा आदेश असल्याचं म्हणत तरुणांनी सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी काढून घेतली. त्यानंतर दोघे दुचाकीवरून पळून गेले, अशी आपबिती मालती यांनी सांगितली.
घटना समोर येताच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. भेलूपूर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घटनेची चौकशी सुरू केली. पोलीस घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासून पाहत आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक रमाकांत दुबेंनी व्यक्त केला.
वाराणसीमधल्या शिवपूरमध्ये २८ मार्चलाच अशाच स्वरुपाची घटना घडली. आपण पोलीस असल्याची बतावणी करत बोगस पोलिसानं महिलेचे दागिने लुटले. निर्मला देवी असं पीडितेचं नाव आहे. निर्मला देवी मंदिरात जात असताना पोलिसाच्या गणवेशात आलेल्या चोरानं त्यांचा रस्ता अडवला. परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे सोन्याची चेन पिशवीत ठेवा, असं चोरट्यानं सांगितलं. महिलेनं चेन काढताच चोरट्यानं ती कागदात बांधून दिल्याचं नाटक केलं. हातसफाई करत त्यानं चेन स्वत:च्या खिशात टाकली. घरी गेल्यानंतर ही बाब महिलेच्या लक्षात आली.