उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षकाने क्रूरतेचा कळस गाठला आहे. दोनचा पाढा विसरला म्हणून एका विद्यार्थ्याच्या हातावर चक्क ड्रिल मशीन चालवल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थी हा कानपूर जिल्ह्यातील सिसामऊ भागातील रहिवासी आहे. प्रेमनगरमधील उच्च प्राथमिक शाळेत पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या घटनेची माहिती मिळताच पीडित विद्यार्थ्याचे नातेवाईक शाळेत पोहोचले. यावेळी शाळेच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. "शिक्षकाने मला दोनचा पाढा विचारला. मला पाढा सांगता न आल्याने त्यांनी माझ्या हातावर ड्रिल मशीन चालवली. तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने ड्रिल मशीनचा स्विच बंद केला" असं विद्यार्थ्याने म्हटलं आहे.
विद्यार्थ्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यावर उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला शाळेतील शिक्षकांनी स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली नव्हती. मात्र, पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी शाळेत घातलेल्या गोंधळानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
कानपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुजीत कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या घटनेचा तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रेमनगर आणि शास्त्री नगरचे ब्लॉक शिक्षण अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवतील. दोषीवर दंडात्मक कारवाई केली जाईल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"