Road Accident : उत्तर प्रदेशातील महोबा येथे भीषण अपघातात आरोबा-नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजोबा-नातू स्कूटीवरुन जात होते, यादरम्यान भरधाव टिप्परने(ट्रक) त्यांना धडक देऊन 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी चालकाला डंपर थांबवण्याचा इशाराही केला, मात्र त्याने वाहनाचा वेग वाढवला.
मिळालेल्या माहितीनुसार, महोबाच्या कानपूर-सागर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. हमीरपूर चुंगीजवळ राहणारे सेवानिवृत्त शिक्षक उदित नारायण चांसोरिया (67 वर्षे) हे त्यांचा 6 वर्षीय नातू नीरज याला स्कूटीवरुन घेऊन जात होते, यावेळी काबराईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पने स्कूटीला जोरदार धडक दिली. यात स्कुटी आणि आजोबा-नातू गाडीखाली अडकले.
यानंतर टिप्पर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी तसेच पळवले आणि दोन किलोमीटरपर्यंत दोघांना फरफटत नेले. अपघातानंतर स्थानिकांनी ट्रक थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र चालक पळून जाण्याच्या उद्देशाने गाडी पळवत राहिला. यानंतर स्थानिकांनी आपल्या वाहनांवरुन डंपरचा पाठलाग करुन डंपरवर दगडफेक केली, तेव्हा चालकाने डंपर थांबवला. तोपर्यंत स्कूटीमध्ये अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांसह नागरिकांची गर्दी झाली.
अपघातानंतर दोन्ही जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एसडीएम सदर जितेंद्र कुमार, सीओ सिटी रामप्रवेश राय यांच्यासह सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे.