अमरोहा - उत्तर प्रदेशच्या अमरोहा इथं हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी आर्थिक तंगीमुळे नाजिम नावाच्या युवकाच्या स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. या कटात त्याच्या जवळच्या मित्रानेही त्याला साथ दिली. दोघांनी मिळून हे अपहरण नाट्य अशाप्रकारे रचलं ज्यामुळे पोलिसांनी तातडीने या घटनेत कारवाई केली. नाजिमनं त्याचा मित्र अमितला सांगून स्वत:चे हातपाय बांधले, त्यानंतर एक व्हिडिओ बनवला आणि तो त्याच्या कुटुंबाला पाठवला.
माहितीनुसार, कुआंखेडा गावात राहणाऱ्या बाबू खा यांनी बछरायू पोलीस स्टेशनला काही अज्ञातांनी माझा २३ वर्षीय भाऊ नाजिमचं अपहरण केले आहे आणि आमच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने ३ पथक बनवून तपासाला सुरुवात केली. त्यात नाजिमचा मित्र अमितला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत नाजिमनं स्वत:चं अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला.
नाजिम आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आर्थिक तंगी आणि पैशाच्या लालसेपोटी आम्ही हा प्लॅन रचला असं आरोपीने तपासात खुलासा केला. अमितनं त्याच्या घरी नाजिमचे हातपाय बांधले, जमिनीवर झोपवून व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ नाजिमनं त्याचा मामेभाऊ नसीमला पाठवला. त्यानंतर नाजिमनं २५ लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज त्याचा दाजी शौकीनला पाठवला. त्यानंतर अमित आणि नाजिम दोघेही नजीबाबादला निघून गेले.
दरम्यान, या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे येताच त्यांनी ३ पथके तपासासाठी रवाना केली. त्यानंतर सर्विलांसच्या मदतीने ८ तासांत पोलिसांनी नाजिम आणि त्याचा मित्र अमितला नजीबाबादहून पकडले. सध्या पोलिसांनी या दोघांना अटक केली असून लवकरच कोर्टासमोर हजर करणार आहेत. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचणं नाजिमसह अमितलाही महागात पडलं आहे.