आजचा दिवस अपघातांच्या मालिकेचा ठरला आहे. हिमस्खलनात अडकलेल्या १० गिर्यारोहकांचा मृत्यू, गुजरातमध्ये रिक्षाच्या अपघातात सात जणांचा मृत्यू अशा देशभरात आज भीषण अपघातांच्या घटना घडलेल्या असताना उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. वऱ्हाडींनी भरलेली बस दरीत कोसळून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पौंडीच्या लैसडोनजवळ हा अपघात घडला आहे. सिमडी गावाजवळ वऱ्हाडींची बस दरीत कोसळली. यात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या बसमधून ४० हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. लालढांग गावातून वऱ्हाडी बिरोखालयेथे जात होते. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ३५० मीटर खोल दरीत कोसळली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पाच डॉक्टरांची टीमदेखील पाठविण्यात आली आहे.
लालडांगचा रहिवासी पंकज याने सांगितले की, दुपारी १२ वाजता बस निघाली होती. सायंकाळी सात वाजता ती दरीत कोसळली. बसमधील ८ ते १० लोक जखमी अवस्थेत दरीतून बाहेर पडले. त्यांनी फोन करून नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. २०१८ मध्ये देखील या ठिकाणी असाच अपघात झाला होता. सकाळी सव्वा आठच्या सुमारास बस दरीत कोसळली होती. यामध्ये ६१ पैकी ४८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
बर्फाच्या वादळात १० गिर्यारोहक ठारउत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे एक अतिशय मोठी घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तरकाशीमध्ये बर्फाच्या वादळामुळे अनेक गिर्यारोहक अडकल्याचे वृत्त आहे. २३ सप्टेंबर रोजी नेहरू पर्वतारोहण संस्थेतील ४० गिर्यारोहकांची टीम उत्तरकाशीहून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर रवाना झाली होती. मंगळवारी येथेच हे सर्व जण हिमस्खलनात अडकले. नेहरू पर्वतारोहण संस्थेचे प्रिंसिपल कर्नल बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ गिर्यारोहक वादळात अडकले असून त्यापैकी १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर १८ गिर्यारोहक अद्यापही बेपत्ता आहेत.