देहरादून - उत्तराखंडमध्ये एअरपोर्ट प्राधिकरणात कामाला असलेल्या एका अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ माजली आहे. राहत्या खोलीत अधिकाऱ्याचा मृतदेह अंगावर महिलेचे कपडे घालून आढळला. कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक लावली होती. इतकेच नाही तर हातात बांगड्याही भरल्या होत्या. या अधिकाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या का केली असावी असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्यांचे २ नातेवाईक घरात होते.
एसएसपी मंजूनाथ टीसी यांनी सांगितले की, नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा अधिकाऱ्याला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले, त्यांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अधिकाऱ्याच्या खोलीत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. अधिकारी २ बीएचके फ्लॅटमध्ये नातेवाईकांसोबत राहिले होते. या तिघांनी रविवारी एकत्र जेवण केले.
प्राथमिक माहितीनुसार, दोघे नातेवाईक एका खोलीत होते, तर मृत अधिकारी झोपण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले होते. या तिघांनी सोमवारी सकाळी ८ वाजता बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केले होते. सकाळी जेव्हा २ नातेवाईकांनी अधिकाऱ्याला फोन केला तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्यांना माहिती दिली. या सर्वांनी मिळून अधिकाऱ्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत अधिकारी दिसला.
मात्र या अधिकाऱ्याने महिलांचे कपडे घातल्याने सगळेच हैराण झाले. महिलांची मॅक्सी, अंडरगारमेंट्स घालून अधिकाऱ्याने जीवन संपवलं. हातात बांगड्या, कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक लावली होती. या अधिकाऱ्याने महिलांचे कपडे घालून आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांनी २ नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स, अन्य डेटा सायबर फॉरेन्सिक लॅबला पाठवलं आहे. हा अधिकारी चांगला होता, कधीही कुठल्या चुकीच्या कामात सहभागी नव्हता असं मृत अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. आता पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूमागे नेमकं कारण काय याचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितले.