देहरादून - गुन्हा घडतो ज्यानं दहशत माजते आणि दहशत कुणाच्याही आयुष्यातील वेदनेचं कारण बनते. परंतु काही घटना वेदना आणि दहशतीपेक्षा भयंकर असते. ज्यानं कुणीही निशब्द होतो. अंगावर काटा आणणारी अशीच एक घटना समोर आली आहे ज्याठिकाणी नाते, प्रेम, दया, सर्व भावनांवर रागानं वर्चस्व मिळवलं. बघता बघता हसतं खेळतं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
सकाळचे ७ वाजले होते. ऋषिकेशच्या रानीपोखरी भागात एका घरात रोजचा दिनक्रम सुरू होता. ३६ वर्षीय नीतूदेवी किचनमध्ये कुटुंबातील सदस्यांसाठी नाश्ता तयार करत होती. त्यांच्यासोबत मुलगी स्वर्णाही किचनमध्ये होती. स्वर्णा दिव्यांग आहे त्यामुळे आई नेहमी लेकीला स्वत:सोबत ठेवते. बाहेरच्या खोलीत नीतूच्या आणखी दोन मुली १३ वर्षीय अपर्णा आणि ११ वर्षीय अन्नपूर्णा शाळेत जाण्याची तयारी करत होत्या. त्यांच्याजवळच मुलींची आजी बसली होती. या मुलींचे वडील महेश तिवारी आतमध्ये पूजा करत होते. सर्वकाही सामान्य होतं.
रोजप्रमाणेच दिवस चालला होता. परंतु त्यानंतर कुटुंबासोबत जे काही घडले त्याची कल्पनाही कुणी केली नसेल. नीतूदेवी किचनमधून पती महेश तिवारी यांना आवाज देते. महेश पूजामध्ये इतका मग्न झालेला असतो ज्यामुळे नीतूचा आवाज तो ऐकू शकत नाही. परंतु नीतू पुन्हा महेशला आवाज देते. किचनमध्ये सिलेंडरमध्ये समस्या निर्माण झालेली असते. वारंवार आवाज दिल्यानंतर महेश पूजा सोडून बाहेर येतो. नीतू आणि महेश दोघं एकमेकांशी बोलत असतात. त्या दोघांमध्ये वाद होतो आणि रागाच्या भरात महेश चाकू उचलून नीतूला मारण्याचा प्रयत्न करतो. नीतू कसंतरी स्वत:चा बचाव करत किचनमधून बाहेर पळते. महेश तिचा पाठलाग करतो. त्यानंतर चाकूने तिच्यावर वार करतो. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलं घाबरतात. मुलं जोरजोराने ओरडू लागतात.
नीतूसोबतच महेश मोठी मुलगी अपर्णालाही चाकूनं मारतो. शेजारीच उभी असलेली अन्नपूर्णा घाबरुन थरथर कापते. त्यानंतर संतापलेला महेश अन्नपूर्णालाही जमिनीवर पाडतो आणि तिच्यावर चाकूने हल्ला करतो. ही घटना पाहून शेजारील सुबोध तातडीने पोलिसांना फोन करतो त्यानंतर आसपासचे लोक जमा होतात. शेजारी बसलेली महेशची वृद्ध आईही हा सारा प्रकार पाहत राहते. भीतीमुळे आणि घाबरून तिच्या चेहऱ्याचाही रंग उडालेला असतो. ती नात स्वर्णा, जी किचनमध्ये नीतूसोबत होती. तिच्याजवळ जाते. दरम्यान, बाहेर पोलीस आणि जमाव जमला. आतमध्ये हे भयानक दृश्य जो कोणी पाहतो तो हैराण झाला. पोलीस दरवाजा तोडून घरात प्रवेश करतात, पण तोपर्यंत महेशने त्याची आई आणि दिव्यांग स्वर्णाचीही हत्या केली होती. काही मिनिटांपूर्वी, जे कुटुंब हसत-खेळत आपल्या दिवसाची तयारी करत होते ते शांत रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं.
कुटुंबातील सदस्यांच्या हत्येमागे पूजा?शेजाऱ्यांशी बोलताना अनेक प्रकारच्या चर्चा समोर आल्या. महेश गेल्या काही महिन्यांपासून अचानक खूप पूजा करू लागला होता. तो अनेकदा त्याच्या पूजेच्या खोलीत राहत असे. त्याला कोणी भेटायला आले तरी तो त्याला भेटत नसे. महेशची पत्नी नीतू अनेकदा पूजा करत असल्याचे लोकांना सांगायची. कधी कधी महेश घराबाहेर दिसायचा. अशा स्थितीत प्रश्न निर्माण व्हायला हवेत. घटनेच्या दिवशीही महेश पूजा कक्षातच होता. आणि त्याला अर्ध्या पूजेतून का उठवलं त्यामुळे तो चिडला. त्यामुळे महेशची पूजा या कुटुंबासाठी काळ बनली होती का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.