हरिद्वारच्या रोशनाबाद कारागृहातून दोन कैदी पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृहात रामलीलाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, संधी साधून वानरांची भूमिका साकारणाऱ्या दोन कैद्यांनी कारागृहामधून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामलीलादरम्यान जेलमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा फायदा घेत त्यांनी शिडीचा वापर केला आणि भिंतीवरून उडी मारून पळ काढला.
कारागृहामध्ये ही घटना अशा वेळी घडली जेव्हा रामलीलामध्ये सीतेचा शोध घेण्याचा सीन सुरू होता, ज्यामध्ये वानरांचा एक गटही सामील होता. कारागृहात उपस्थित असलेले सर्व लोक रामलीला पाहण्यात व्यस्त होते, त्यामुळे वानरांची भूमिका बजावणारे कैदी प्रत्यक्षात भिंतीवरून उडी मारून पळून जात असल्याचं कोणालाच कळलं नाही.
पळून गेलेल्या कैद्यांची नावे पंकज आणि राजकुमार अशी आहेत. पंकज एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, तर राजकुमार अपहरण प्रकरणात जेलमध्ये होता. कैदी पळून गेल्यानंतर कारागृह प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारागृहात सुरू असलेले बांधकाम आणि रामलीला कार्यक्रमांमध्ये देखरेख करण्यात हलगर्जीपणा असल्याचेही समोर येत आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण कारागृह आणि परिसरात सतर्कता वाढवली आहे. फरार कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच कैद्यांना लवकरात लवकर पकडता यावं यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेने कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.